
आनंदात असलेल्या खुशीने मेसेज पाहताच टोकाचे पाऊल उचलले; आयडी कार्डच्या लेसनी गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
नागपूर : एक क्षणभर आधी आनंदाने गप्पा मारणारी आणि घराची कामे करणारी १९ वर्षीय तरुणी, मोबाईलवर आलेला एक ‘टेलिग्राम मेसेज’ पाहताच मृत्यूच्या दारात कशी जाते? या प्रश्नाने सध्या नागपूर पोलीस आणि नागरिक सुन्न झाले आहेत. हुडकेश्वर परिसरातील खुशी संजय गिरी या बीसीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आता ‘आत्महत्येस प्रवृत्त’ केल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्या रहस्यमय टेलिग्राम आयडीचा शोध सुरू केला आहे.
९ मार्च रोजी दुपारी ३:२५ ते ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. खुशीने आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये जाऊन नळाला तिच्या कॉलेजच्या ओळखपत्राची (Identity Card) लेस बांधली आणि गळफास घेतला. सुरुवातीला हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान खुशीच्या आईने, गीता गिरी यांनी मुलीच्या मोबाईलची पाहणी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली.
आत्महत्या करण्याच्या काही मिनिटे आधी खुशीच्या टेलिग्राम आयडीवर एक व्हिडिओ मेसेज आला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खुशी थेट बाथरूममध्ये गेली. तिने नळाला फास बांधला आणि खाली बसली, ज्यामुळे गुदमरून तिचा मृत्यू झाला. हा मेसेज नेमका कोणी पाठवला आणि त्या व्हिडिओमध्ये असे काय होते की खुशीने अचानक हा निर्णय घेतला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, आत्महत्येच्या दिवशी खुशी अत्यंत आनंदी होती. तिने आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी लागणारे साहित्य आणून दिले होते. दुपारी १:३० वाजता आईने दिलेल्या पैशातून तिने शिक्षक सहकारी बँकेत जाऊन घराच्या फ्लॅटची किश्त (EMI) देखील भरली होती. घरात आजीशी ती आनंदाने बोलली होती. आई कर्तव्यावर (एसटी महामंडळात वाहक) गेल्या होत्या आणि भाऊ दुसऱ्या खोलीत झोपला होता. सर्व काही सामान्य असताना दुपारी ३:२५ ला आलेल्या त्या एका मेसेजने सर्व काही उद्ध्वस्त केले.
खुशीच्या पश्चात तिची आई गीता, १२ वीत शिकणारा मोठा भाऊ मिहीर आणि आजी असा परिवार आहे. एक उमदी आणि शिकणारी मुलगी अशा प्रकारे सायबर जगातील कोणत्यातरी अज्ञात मेसेजमुळे बळी पडल्याने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवणे आणि मुलांना सायबर धमक्यांविरुद्ध जागरूक करणे काळाची गरज बनली आहे. टेलिग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या अनोळखी लिंक्स किंवा व्हिडिओपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



