क्राईमभंडाराविदर्भ

चारचाकी वाहनातून सुगंधित तंबाखूची तस्करी ; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अड्याळ पोलिसांची धडक कारवाई ; पोलिसांना पाहताच तस्कर वाहन सोडून फरार

भंडारा : जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीत सुगंधित तंबाखूच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान संशयास्पद वाटलेल्या एका महागड्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी ६ लाख १३ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत वाहनासह एकूण १४ लाख १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.

अड्याळ पोलीस हद्दीत गस्त घालत असताना समोरून एक ग्रे रंगाचे ‘फोर्स वन न्यू बॅण्ड’ चारचाकी वाहन (क्रमांक MH 02 CL 8078) विरुद्ध दिशेने येताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याचे लक्षात येताच, काही अंतरावर वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून चालक झाडीझुडपांचा फायदा घेत पसार झाला.

पोलिसांनी उभे असलेल्या वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यात सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पिवळ्या रंगाच्या ३२ चुंगळ्या, पांढऱ्या रंगाच्या ११ चुंगळ्या आणि दोन मोठे कागदी बॉक्स (किंमत: ६,१३,३५० रुपये). ८ लाख रुपये किमतीची ‘फोर्स वन’ कार. असा एकूण १४ लाख १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी अड्याळचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे. आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १२३, २२३ आणि २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे करत आहेत.

अड्याळ मार्गावरून सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारमध्ये तंबाखू घेऊन चालक नेमका कुठे जात होता आणि यामागे कोणते मोठे ‘हात’ आहेत, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button