
जिल्हाधिकारी सावंत कुमार यांचे अचूकतेवर भर देण्याचे आवाहन; मास्टर ट्रेनर्सकडून माहिती संकलनाचे विशेष धडे
भंडारा : देशाच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय जनगणना’ कार्यक्रमाची पूर्वतयारी भंडारा जिल्ह्यात वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर आज ३६ प्रशिक्षकांचा (ट्रेनर) विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात आयोजित या सत्रात जनगणनेची प्रक्रिया त्रुटीरहित पार पाडण्यावर भर देण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान मास्टर ट्रेनर श्री. शिवरकर तसेच जनगणना विभागाचे चेतन गायधने यांनी उपस्थित ३६ प्रशिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. जनगणना प्रक्रियेतील गुंतागुंतीचे मुद्दे, घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्याची शास्त्रोक्त पद्धत आणि संकलित माहितीमध्ये कमालीची अचूकता कशी राखावी, या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. हे ३६ प्रशिक्षक आता जिल्हाभरातील प्रगणकांना (Enumerators) प्रशिक्षित करणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी सावंत कुमार आणि निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. “जनगणना हा केवळ एक आकडा नसून तो भविष्यातील धोरण निश्चितीचा पाया आहे. हा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असल्याने तो विहित वेळेत आणि पूर्ण अचूकतेने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी चोख पार पाडावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी यावेळी केले.
१६ मे पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष भेटीतून मिळणारी माहिती यात तफावत राहू नये, यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आगामी जनगणना कार्यक्रम अधिक सक्षमपणे राबविण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी देखील येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्यांना खरी आणि अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



