गोंदियाविदर्भ

पर्यावरण रक्षणासाठी नागपूर ते पंढरपूर सायकल वारी; गोंदियाचे दोन सायकलस्वारही सहभागी

आषाढी एकादशीनिमित्त ‘टायगर ग्रुप‘ व ‘क्रीडा भारती‘चे आयोजन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखवणार हिरवा झेंडा

गोंदिया : पर्यावरण संरक्षण, उत्तम आरोग्य राखणे आणि पेट्रोल बचत याबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर’ आणि नागपूरच्या ‘क्रीडा भारती’ यांनी संयुक्तपणे आषाढी एकादशीनिमित्त नागपूर ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन केले आहे. १५ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या सायकल वारीत १३ ते ८५ वयोगटातील लोकांनी सहभाग घेतला असून, विदर्भातून एकूण ८५ सायकलस्वार सहभागी होणार आहेत. यामध्ये गोंदिया शहरातील ‘सायकलिंग संडे ग्रुप’चे दोन सदस्य अशोक मेश्राम आणि माजी सैनिक उदयभान निर्वाण हे पंढरपूर सायकल वारीमध्ये सहभागी होणार आहेत.

गोंदियातील हे दोन्ही सायकलस्वार १३ जून रोजी सकाळी ६ वाजता जयस्तंभ चौक येथून आपली वारी सुरू करतील. तर, नागपूर येथून संपूर्ण विदर्भातील सायकलस्वार येत्या १५ जून रोजी नागपूर येथील गुरुदेव नगर मंदिरापासून सुरू होणाऱ्या या सायकल वारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हिरवा झेंडा दाखवतील.

राज्यातून साडेतीन हजार सायकलस्वार सहभागी ; पंढरपुरात होणार ‘रिंगण सोहळा‘

या अनोख्या सायकल वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ८२ वेगवेगळ्या क्लबचे सुमारे साडेतीन हजार सायकलस्वार पंढरपूरमध्ये एकत्र येणार आहेत. वारकऱ्यांप्रमाणेच हे सर्व सायकलस्वार २२ जून रोजी पंढरपूरमध्ये ‘रिंगण सोहळा’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होतील.

हा उपक्रम केवळ एक साहसी सायकल मोहीम नसून, पर्यावरण आणि आरोग्यासाठी एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button