गडचिरोलीविदर्भ

जिल्हाधिकाऱ्यांकडून वडसा तालुक्यात ‘ऑनफिल्ड’ आढावा! ६० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या संथगतीवर नाराजी

पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; कृषी, पर्यटन आणि सूक्ष्म अन्नप्रक्रिया प्रकल्पांची केली सखोल पाहणी

देसाईगंज : जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी वडसा तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ६० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेपासून ते शेडनेट-पॉलीहाऊसपर्यंतच्या विविध प्रकल्पांचा प्रत्यक्ष ‘ऑनफिल्ड’ आढावा घेतला. देसाईगंज शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाला कडक शब्दांत तंबी दिली.

देसाईगंज नगरपरिषदेंतर्गत सुरू असलेल्या ६० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी कामाच्या संथ गतीबद्दल संताप व्यक्त केला. “नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम पूर्ण झालेच पाहिजे,” अशा सूचना त्यांनी दिल्या. योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून कामाचा वेग वाढवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या दौऱ्यात केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर उपजीविकेच्या साधनांवरही लक्ष केंद्रित केले: कृषी क्षेत्र: शेतकऱ्यांनी स्वखर्चातून आणि शासकीय योजनेतून उभारलेल्या शेडनेट व पॉलीहाऊस प्रकल्पांना त्यांनी भेट दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. सूक्ष्म अन्नप्रक्रिया: सावंगी येथील डाळ मिलला भेट देऊन प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा आढावा घेतला. ग्रामीण भागात अशा उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विसोरा येथील एसआरपीएफ (SRPF) कॅम्पला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि जवानांशी संवाद साधला. तसेच, जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन पार्कच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी दप्तर, स्थानिक शाळा आणि इतर विकासकामांची अचानक पाहणी केली. प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान असावे, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश त्यांनी उपस्थितांना दिले.

या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, तहसीलदार प्रिती डुडुलकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या ‘ऑनफिल्ड’ ॲक्शनमुळे वडसा तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना आता नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button