गडचिरोलीविदर्भ

सरकारची कामगिरी आणि विचारधारा प्रत्येक घरात पोहोचवा – माजी खा. डॉ. अशोक नेते

अरततोंडी येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान ; दोन दिवसीय निवासी कार्यशाळेत कार्यकर्त्यांना संघटन कौशल्याचे धडे

कुरखेडा : भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय संघटना नसून ती ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जोपासणारी एक सशक्त विचारधारा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हेच प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रमुख ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केले.

कुरखेडा मंडळाच्या वतीने अरततोंडी येथील श्री भगवान महादेव देवस्थानच्या सभागृहात आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान–२०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळातील ऐतिहासिक कामांचा उल्लेख करताना डॉ. नेते यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की: औद्योगिक क्रांती: सुरजागड लोह प्रकल्प आणि कोनसरी स्टील प्लांटमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. दळणवळण: वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग, हवाई पट्टी आणि १५ हजार कोटींची रस्ते विकासकामे प्रगतीपथावर आहेत. शिक्षण व आरोग्य: मेडिकल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयामुळे गडचिरोलीची ओळख बदलली आहे. सिंचन: कोटगल व चिचडोह बॅरेजसारख्या प्रकल्पांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली आहे.

या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना केवळ सैद्धांतिक माहितीच नाही, तर प्रत्यक्ष मैदानात काम करण्याचे तंत्रही शिकवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने: संघटनात्मक बांधणी: पक्षाची कार्यपद्धती आणि शिस्त. जनसंपर्क: ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रानुसार लोकांशी संवाद साधण्याचे कसब. सोशल मीडिया: आधुनिक युगात सरकारी योजनांचा प्रचार प्रभावीपणे करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर.

या कार्यशाळेला ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, डॉ. भारत खटी, कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ॲड. उमेश वालदे, पडोळे गुरुजी, कापगते, जिल्हा सचिव रुपाली कावळे, शहर अध्यक्ष कल्पना मांडवे, सुनिता दखणे यांच्यासह तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

या महाअभियानामुळे कुरखेडा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा मैलाचा दगड ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button