अमरावतीगडचिरोलीविदर्भ

चिखलदऱ्यात भाजपा आदिवासी मोर्चाची भव्य जनसंवाद बैठक ; डॉ. देवराव होळी यांचे कार्यकर्त्यांना प्रभावी मार्गदर्शन

शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार

अमरावती : मेळघाटातील निसर्गरम्य चिखलदरा येथे भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या वतीने आयोजित ‘आदिवासी जनसंवाद यात्रा’ मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाली. भाजपा आदिवासी मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीने अमरावती जिल्ह्यातील आदिवासी राजकारणात नवे चैतन्य निर्माण केले आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. होळी यांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा पाढा वाचला. “भारतीय जनता पार्टी ही आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. सरकारने सुरू केलेल्या योजना केवळ कागदावर न राहता, त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच, आदिवासी समाजाशी घट्ट नाते निर्माण करून संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या जनसंवाद यात्रेला केवळराम काळे (आमदार), प्रभुदास भिलावेकर (माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष), आकाश मडावी (नागपूर शहर अध्यक्ष, आदिवासी मोर्चा), रमेश मावस्कर (भेल संचालक), रेखा मावस्कर (माजी जिल्हा महामंत्री), साबुलाल दहिकर व सुखदेव पवार (जिल्हाध्यक्ष, आदिवासी मोर्चा), कमलनारायण उईके (जिल्हाध्यक्ष, मोर्शी) उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रमांची रूपरेषा मांडण्यात आली. डॉ. होळी यांनी कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन लोकांशी थेट संवाद साधण्याचे निर्देश दिले. या यात्रेमुळे चिखलदरा आणि धारणी परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आदिवासींच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या यशस्वी नियोजनामुळे ही जनसंवाद यात्रा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button