गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत महामानवाला अभिवादन; माजी खा. डॉ. अशोक नेते व आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत भीमजयंती उत्साहात

उन्हाचा तडाखा लक्षात घेता जनसंपर्क कार्यालयाबाहेर भव्य ‘शरबत वाटप‘ ; अनुयायांची सेवा करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन

गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली शहरात मंगळवारी (दि.१४) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजप एसटी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. उत्सवाच्या आनंदासोबतच कडक उन्हाचा विचार करून राबविण्यात आलेल्या ‘शरबत वाटप’ उपक्रमाने नागरिकांची मने जिंकली.

चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. अशोक नेते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना ही देशाची खरी संपत्ती आहे. त्यांचे विचार आचरणात आणणे आणि जनसेवा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. याच उद्देशाने आज सामाजिक बांधिलकीतून आम्ही हा छोटासा सेवा उपक्रम राबविला आहे.”

विदर्भातील वाढत्या तापमानामुळे जयंतीनिमित्त शहरात येणाऱ्या भीमानुयायांना आणि नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने डॉ. अशोक नेते यांच्या वतीने भव्य ‘शरबत वाटप’ करण्यात आले. चामोर्शी रोडवरून जाणाऱ्या शेकडो नागरिकांनी या थंड पेयाचा लाभ घेतला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सोहळ्याला नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, रमेश भुरसे (कि.मो. प्रदेश सचिव), अनिल कुनघाडकर (शहराध्यक्ष), योगिता पिपरे (महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा), प्रमोद पिपरे (ज्येष्ठ नेते), डॉ. प्रणय खुणे (जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष, मानवाधिकार संघटना), मधुकर भांडेकर (भाजयुमो जिल्हाध्यक्ष), रेखा डोळस (महिला मोर्चा प्रदेश सचिव), सुधाकर येनगंदलवार, अरुण हरडे, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, सीमा कन्नमवार, सागर निंबोरकर आणि स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केवळ उत्सव साजरा न करता, कडक उन्हात नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेल्या या लोकोपयोगी उपक्रमामुळे भाजपच्या या दोन्ही नेतृत्वाचे गडचिरोलीत सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button