गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्हा बँकेला मिळाल्या पहिल्या महिला अध्यक्ष ; ईशा पोरेड्डीवार यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्षपदी खिळसागर नाकाडे व मानद सचिवपदी दिपक निंबेकर यांची निवड

गडचिरोली : सहकार क्षेत्रातील जिल्ह्याची मातृसंस्था असलेल्या ‘गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या’ २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नवीन पदाधिकारी निवड आज मोठ्या उत्साहात पार पडली. बँकेच्या अध्यक्षपदी ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला नेत्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला असून, त्यांच्या निवडीने सहकार क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

बँकेच्या सभागृहात बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची विशेष सभा पार पडली. अध्यक्षपदासाठी ईशा प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्षपदासाठी खिळसागर यादवराव नाकाडे आणि मानद सचिवपदासाठी दिपक राजेश्वर निंबेकर यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. निवड जाहीर होताच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

नवनियुक्त अध्यक्ष ईशा पोरेड्डीवार या अत्यंत उच्चशिक्षित आहेत. त्यांनी B.Sc., MBA (HR) आणि ‘कंपनी सेक्रेटरी’ (CS) यांसारख्या कठीण पदव्या संपादन केल्या आहेत. कायदेशीर अनुपालन (Legal Compliance), कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि मानव संसाधन या विषयातील त्यांच्या सखोल ज्ञानाचा बँकेच्या आधुनिक व्यवस्थापनासाठी आणि प्रगतीसाठी मोठा फायदा होणार आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारी, अनंत साळवे, डॉ. दुर्वेश भोयर, अतुल नागुलवार, डॉ. बलवंत लाकडे, खेमनाथ डोंगरवार आणि बंडुजी ऐलावार उपस्थित होते. यासोबतच नवनियुक्त संचालक मंडळातील सौरभ म्हशाखेत्री, योगाजी फटाले, श्रीकांत नागीलवार, गजानन साळवे, गोकुलदास भट, सुनील तेलकुंटलवार, प्रणिता चिटकेशी, नेत्रा साळवे आणि इतर सर्व संचालकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. जिल्हा बँकेच्या या नव्या नेतृत्वाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना अधिक गतिमान व पारदर्शक सेवा मिळेल, असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button