भंडाराविदर्भ

लाखांदूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे लोकार्पण ; दिशा प्रकल्पातून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

भंडारा : लाखांदूर येथील नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, तर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खासदार प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले, आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, पोलीस निरीक्षक सचिन पवार यावेळी उपस्थित होते.

लाखांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ४८ गावे येत असून, या सर्व गावांतील नागरिकांना अधिक सक्षम व सुसज्ज पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून नवीन इमारतीस मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळाच्या मंजुरीनंतर सन २०२२ मध्ये या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. सादिक अँड कंपनी, नागपूर यांच्या मार्फत नोव्हेंबर २०२२ मध्ये बांधकामास सुरुवात होऊन जानेवारी २०२४ मध्ये इमारत पूर्ण करण्यात आली.

नवीन इमारतीला सन २०२५ मध्ये ISO नामांकन प्राप्त झाले असून, या माध्यमातून नागरिकांना आधुनिक व परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर लाखांदूर शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती, भंडारा यांच्या २०२५-२६ आर्थिक वर्षातील मंजुरीनुसार शहरात एकूण ४८ बुलेट कॅमेरे व ४ PTZ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणांवर २४ तास नजर ठेवली जात असून, गुन्हे तपासात याचा मोठा उपयोग होत आहे.

तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी पोलीस विभागाच्या पुढाकारातून ‘दिशा प्रकल्प’ अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनच्या मागील हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेत एकावेळी ४८ विद्यार्थ्यांसाठी बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी अद्ययावत पुस्तके देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या उपक्रमांमुळे लाखांदूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असून, पोलीस प्रशासन अधिक सक्षम व नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास विविध मान्यवर, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button