मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा प्रदेश कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक

गावागावात पक्ष विस्तारण्याचे उद्दिष्ट; डॉ. देवराव होळी यांनी सादर केला आदिवासी मोर्चाचा प्रगती अहवाल
मुंबई : भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक अभेद्य करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी मुंबईत प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ‘तळागाळातील कार्यकर्ता’ आणि ‘गावागावातील संघटन’ या सूत्रावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या सर्व सरचिटणीसांना, मोर्चा पदाधिकाऱ्यांना आणि प्रभारींना कडक सूचना दिल्या. पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी केवळ संवाद न साधता, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. संघटनात्मक मजबुतीसाठी प्रत्येक बुथ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याचे ध्येय या बैठकीत निश्चित करण्यात आले.
या बैठकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी सादर केलेला अहवाल. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी आदिवासी पट्ट्यात केलेल्या दौऱ्यांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडला. “आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या विकासासाठी भाजपची धोरणे प्रभावीपणे राबवली जात आहेत. आगामी काळात संपूर्ण राज्यातील आदिवासी बांधवांना पक्षाशी जोडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,” असे डॉ. होळी यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीस आमदार योगेश सागर (प्रभारी), चित्रा वाघ (प्रदेशाध्यक्ष, महिला मोर्चा), डॉ. संजय कुथे (महामंत्री), माधवी नाईक, आमदार निरंजन डावरे व राजेश पांडे (सरचिटणीस), नरेंद्र पवार (अध्यक्ष, विमुक्त भटक्या जमाती) तसेच किसान आघाडी, युवा मोर्चा आणि अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारीही या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत केवळ अहवाल वाचन झाले नाही, तर भविष्यातील आंदोलने, मेळावे आणि जनसंपर्क मोहिमांची रूपरेषाही ठरवण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, आगामी काळात भाजप अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांवर काम करताना दिसेल, असे संकेत यावेळी मिळाले. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीमुळे भाजपच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळात याचे परिणाम जमिनी स्तरावर पाहायला मिळतील.



