
‘प्रोजेक्ट उडान‘ अंतर्गत भव्य रोजगार मेळावा ; पोलीस दलाच्या उपक्रमाचे कौतुक करत विकासाची दिली ग्वाही
गडचिरोली : “विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर गडचिरोलीचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारे उत्पादनवाढ आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून सामान्यांचे जीवनमान उंचावणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सहपालकमंत्री जयस्वाल यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “गडचिरोलीतील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणे ही बाब माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. म्हणूनच इतर सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून मी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिलो.” यावेळी त्यांनी १९९९ मध्ये रामटेक मतदारसंघातील परिस्थितीचा दाखला देत, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून दुर्गम भागात कसे बदल घडवता येतात, याचे उदाहरण दिले. गडचिरोलीतही पायाभूत सुविधांचे जाळे विणून कायापालट करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. जिल्ह्यातील प्रति व्यक्ती उत्पन्न वाढावे आणि नक्षलमुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वेगाने वाटचाल व्हावी, यासाठी शासन पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वनसंपत्तीचा वापर करून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगार निर्माण होऊ शकतात. यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असून, या विकास प्रक्रियेत शेतकऱ्यांना सोबत घेऊनच पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलमुक्तीसाठी पोलीस दलाने केलेल्या साहसी कार्याबद्दल त्यांनी दलाचे मनापासून अभिनंदन केले. या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नव्या दिशा मिळाल्या असून, सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासकीय यंत्रणेतही नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे.



