
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून पोलीस स्टेशन मूलचेरा येथे एक विशेष परिवर्तनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ६८ दारूविक्रेत्यांना बोलावून त्यांना दारू विक्रीचे दुष्परिणाम आणि सन्मानाने जगण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला उपस्थित विक्रेत्यांना ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाचे भाग तसेच विशेष पीपीटी सादरीकरण दाखवण्यात आले. दारू विक्रीमुळे समाजात होणारे वाईट परिणाम, विखुरलेली कुटुंबे आणि तरुण पिढीचे होणारे नुकसान यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अपंग, वयोवृद्ध लोक अवैध व्यवसाय न करता ईतर छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत, मग तुम्ही शारीरिक दृष्ट्या सुदृढ असूनही दारूविक्रीचा व्यवसाय बंद करून इतर व्यवसाय का करू शकत नाही. असे सांगत विविध उदाहरण देऊन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी समुपदेशक राजेश पवार यांनी ‘व्यसन हा एक आजार’ असून त्यावर उपचार कसे शक्य आहेत, यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. या अनोख्या उपक्रमात पोलीस निरीक्षक महेश विधाते स्वतः उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विक्रेत्यांशी संवाद साधताना आवाहन केले की, “दारूचा व्यवसाय सोडून उदरनिर्वाहाचे इतर सन्मानजनक पर्याय निवडा आणि एक चांगला माणूस म्हणून समाजात जगा.” या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दारू विक्रेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि यापुढे दारू विक्री न करण्याचा तसेच व्यवसायातून बाहेर पडण्याचा संकल्प केला.
मुक्तीपथचे तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी दारूविक्री करणाऱ्या महिलांशी संवाद साधताना अत्यंत भावनिक आवाहन केले. ते म्हणाले की, “तुम्ही दारू विकून आपल्या स्वतःच्या मुलांसारख्या असणाऱ्या तरुणांना विष पाजत आहात. यामुळे तुमच्या सुनांसारख्या अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.” त्यांच्या या रोकठोक बोलण्यामुळे उपस्थित महिला विक्रेत्यांमध्येही परिवर्तनाची भावना दिसून आली. पोलीस स्टेशनच्या आवारात दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमामुळे मूलचेरा तालुक्यात एक सकारात्मक संदेश गेला आहे. केवळ कारवाई न करता, संवाद आणि प्रबोधनातून गुन्हेगारी व सामाजिक अपप्रवृत्ती रोखण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



