क्राईमगडचिरोलीविदर्भ

आलापल्लीत १५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त!

​गडचिरोली : जिल्ह्यामध्ये दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध दारू तस्करीला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांच्या कडक आदेशानंतर, २१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि अहेरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आलापल्ली येथून १४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

​गुरुवारी, स्थानिक गुन्हे शाखेला विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालयासमोर एका बोलेरो कॅम्पर वाहनातून मोठ्या प्रमाणावर विदेशी व देशी दारूची तस्करी केली जाणार आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि अहेरी पोलीस स्टेशनच्या पथकाने पंचासह घटनास्थळी सापळा रचला.

​त्या ठिकाणी काळसर तपकिरी रंगाचे बोलेरो कॅम्पर वाहन (क्र. MH 12 SX 6981) संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच आरोपी पसार झाला, मात्र वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना धक्काच बसला. ​वाहनाच्या तपासणीत ​बिअर कॅन: हायवर्ड्स ५००० कंपनीचे ११०४ नग (किंमत अंदाजे ३,३१,२००/- रु.), ​देशी दारू: रॉकेट संत्रा कंपनीचे २२०० निपा (किंमत अंदाजे १,७६,०००/- रु.), ​रॉयल स्टॅग विस्की: १२० बॅरेल (किंमत अंदाजे ४,८०,०००/- रु.), ​वाहन: गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कॅम्पर (किंमत ५,००,०००/- रु.) असा ​एकूण १४,८७,२०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

​याप्रकरणी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास अहेरीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ​या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, अहेरीचे पोनि. हर्षल ओकरे, सपोनि. भगतसिंग दुलत, अंमलदार शिवप्रसाद करमे, रोहित गोंगले, संदीप भेंडारे, राकेश करमे, ज्ञानेश्वर निलावार, नितेश दाने आणि अनंत सातपुते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button