
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणार पुरेसा वेळ; लवकरच जाहीर होणार नवीन वेळापत्रक.
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत एलएलबी (LLB) शाखेच्या परीक्षांच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या चिंतेचे ढग अखेर दूर झाले आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, कुलगुरूंनी एलएलबीच्या विविध सत्रांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये पार पडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महाविद्यालयीन कामकाज, मूट कोर्ट प्रॅक्टिकल, आंतरराष्ट्रीय परिषद आणि इंटर्नशिप यांसारख्या शैक्षणिक उपक्रमांचा धडाका सुरू झाला. वार्षिक संमेलन आणि असायमेंट पूर्ण करता करताच २२ एप्रिलपासून चौथ्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या अत्यंत कमी कालावधीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळच मिळाला नव्हता, परिणामी विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी होती.
विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन आमदार सुधाकर अडबाले यांनी तातडीने गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. “केवळ परीक्षा घेणे हा उद्देश नसून विद्यार्थ्यांना तयारीसाठी योग्य संधी मिळणे गरजेचे आहे,” असे सांगत त्यांनी एलएलबीच्या ३ वर्षे आणि ५ वर्षे अभ्यासक्रमाच्या विविध सत्रांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची ठाम मागणी केली.
आमदार अडबाले यांच्या मागणीनुसार, विद्यापीठ आता खालील परीक्षांचे नवीन वेळापत्रक जारी करणार आहे: ३ वर्षीय एलएलबी: चौथे, पाचवे आणि सहावे सत्र. ५ वर्षीय एलएलबी: तिसऱ्या सत्रापासून ते दहाव्या सत्रापर्यंतच्या परीक्षा. ४ वर्षीय अभ्यासक्रम: संबंधित सत्रांच्या परीक्षा.
कुलगुरूंनी आजच या संदर्भातील नवीन वेळापत्रक जारी करण्याचे आश्वासन दिल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “आमच्या शैक्षणिक हितासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या आमदार महोदयांमुळेच आम्हाला अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले आहेत. आमदार सुधाकर अडबाले यांच्या या पुढाकारामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला मोठा आधार मिळाला आहे.



