
राज्य प्राणी ‘शेकरू’सह दुर्मिळ पक्ष्यांची शिकार; वनविभागाच्या दुर्लक्षामुळे तस्कर आणि शिकाऱ्यांचे फावले
गडचिरोली : मौल्यवान वनसंपत्ती आणि दुर्मिळ जैवविविधतेसाठी ओळखले जाणारे एटापल्ली वनपरिक्षेत्र सध्या तस्कर आणि शिकाऱ्यांच्या विळख्यात सापडले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड, वन्यजीव शिकार आणि अवैध उत्खननाचे सत्र सुरू असून, प्रशासनाच्या सुस्त भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राज्याचा मानबिंदू असलेला राज्य प्राणी ‘शेकरू’ आणि राज्य पक्षी ‘हरियल’ यांचीही शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भामरागड वनविभागांतर्गत आलापल्ली परिसरात अलीकडेच करण्यात आलेल्या एका कारवाईत एटापल्ली तालुक्यातील उडेरा येथील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जंगलात शिकाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांनी केवळ सर्वसामान्य प्राणीच नव्हे, तर दुर्मिळ उडणारी खार (शेकरू), राज्य पक्षी हरियल आणि दयाळ (रॉबिन) यांची निर्घृण शिकार केली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ सारख्या कडक कायद्याला या शिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

एटापल्ली वनपरिक्षेत्रात केवळ शिकारीच नव्हे, तर अवैध वृक्षतोड आणि खनिजांच्या उत्खननाचेही पीक आले आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ आणि खनिज अधिनियम १९५७ नुसार वनसंपत्तीचे रक्षण करणे बंधनकारक असतानाही, जंगलातील मौल्यवान लाकडांची राजरोस चोरी होत आहे. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत हे प्रकार घडत असून, यामागे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जंगलाच्या अंतर्गत उपक्षेत्रांमध्ये वारंवार होणाऱ्या या गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक वन प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. गस्त घालणाऱ्या पथकांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे तस्करांचे मनोबल वाढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आनंद दहागावकर, संजय यमसलवार यांनी केला आहे. त्यांनी मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एटापल्ली जंगलातील या वाढत्या बेकायदेशीर कारवायांमुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. प्रशासनाने जर आताच कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात येथील दुर्मिळ वन्यजीव केवळ चित्रांमध्येच उरतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या आताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, एटापल्लीची वनसंपदा वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.



