
आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात संपर्क मोहीम ; पक्षसमर्थित पॅनलला विजयी करण्याचा निर्धार
गडचिरोली : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील डॉक्टर मतदारांना संघटित करण्यासाठी आणि पक्षसमर्थित पॅनलच्या बाजूने कौल मिळवण्यासाठी व्यापक संपर्क मोहीम राबविण्यात आली. या निवडणुकीत वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करणाऱ्या सक्षम नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले.
निवडणुकीच्या दिवशी जिल्ह्यातील डॉक्टर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या वतीने या मतदारांशी थेट संवाद साधून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. “वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्न ताकदीने मांडण्यासाठी पक्षसमर्थित उमेदवारांचे निवडून येणे आवश्यक आहे,” असा संदेश यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवला.
या मोहिमेदरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर मतदारांशी संवाद साधून पॅनलच्या बाजूने एकजूट निर्माण केली.
जिल्ह्यातील डॉक्टर मतदारांचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध मोर्चेबांधणी यामुळे पक्षसमर्थित पॅनलच्या विजयासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रभावी नियोजन आणि थेट संवादामुळे गडचिरोलीत ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली.
वैद्यकीय क्षेत्रातील ही निवडणूक केवळ डॉक्टरांपुरती मर्यादित न राहता, राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी देखील महत्त्वाची मानली जात आहे. आता या प्रचाराचे रूपांतर विजयात होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



