
८८० रु. दंड वसूल
गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात ‘तंबाखूविरोधी’ धाडसत्र राबवण्यात आले. या मोहिमेदरम्यान धूम्रपान निषिद्ध क्षेत्राची जनजागृती करण्यासोबतच, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल माहिती देणारे पोस्टर वाटून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. या कारवाईत ६ कर्मचारी व नागरिकांवर कोटपा कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करत ८८० रुपये दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व सार्वजनिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे किंवा त्यांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात तंबाखू किंवा गुटखा खाणाऱ्या आणि बाळगणाऱ्या ६ कर्मचारी व लोकांवर तंबाखू नियंत्रण (कोटपा) कायदा २००३ (COTPA Act 2003) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ८८०/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, के.टी.एस. रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, जिल्हा सल्लागार संजय धार्मिक, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत तंत्रज्ञ यश जयस्वाल, दंत सहायक विवेकानंद कोरे यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशन विभागाचे देवानंद हेमने आणि राजू राठोड यांचा सहभाग होता. आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची कसून तपासणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनाला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.



