चंद्रपूरविदर्भ

चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र देशातील आदर्श रोजगारनिर्मिती केंद्र ठरेल – आ. सुधीर मुनगंटीवार

बांबू सखींच्या आत्मनिर्भरतेला नवी दिशा; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते टूलकिट वितरण

चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात कॅम्पा सन 2025-26 अंतर्गत प्रशिक्षण प्राप्त बांबू कारागीर महिलांसाठी उपजीविका टूलकिट वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वरवट, घुग्घूस, चिचपल्ली, मोहर्ली, चोरगाव आणि निंबाळा येथील एकूण 37 महिला बांबू सखींना प्रातिनिधिक स्वरूपात टूलकिटचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांना विद्यावेतनाचे धनादेशही प्रदान करण्यात आले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ प्रशिक्षणाचे नव्हे, तर महिलांना आत्मनिर्भर बनविणारे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे देशातील आदर्श केंद्र ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक आर. रामानुजम, वाहतूक व विपणन विभागाचे उपवनसंरक्षक विशाल माळी, उपवनसंरक्षक (मध्यचांदा) योगेश वाघाये, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार, विभागीय वन अधिकारी राजन तलमले, वन अकादमीच्या अपर संचालक मनीषा भिंगे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध आकर्षक व उपयुक्त वस्तूंची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच कॅम्पा सन 2025-26 अंतर्गत प्रशिक्षण माहिती पुस्तिका (यशोगाथा) चे विमोचन करण्यात आले. यावेळी बांबू सखींचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणार्थी भत्ता म्हणून प्रति दिवस 150 रुपये दराने दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचे धनादेशही आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या हाताला काम मिळून त्यांना स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा विकासाच्या वेगाने पुढे जात असताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. एक वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना दुसरा वर्ग रोजीरोटीच्या संघर्षात अडकलेला राहणे योग्य नाही. वनविभाग गावागावांत रोजगार उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वनमंत्री म्हणून कार्य करताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने वनधन योजना सुरू करण्यात आली. वन अकादमीची स्थापना, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची उभारणी आणि ताडोबाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यात आले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि रोजगाराभिमुख व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे हा होता. आजपर्यंत सुमारे ६५० महिलांना येथे प्रशिक्षण देण्यात आले असून, भविष्यात हजारो महिलांच्या हाताला काम देण्याची क्षमता या केंद्रात आहे.

देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंब सक्षम आणि सशक्त व्हावे, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर बाजारपेठ, क्लस्टर आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. या टूलकिटच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासारखेच 50 एकर मध्ये महिलांना 62 विविध प्रकारचे कोर्सेस चे प्रशिक्षण देणारे एसएनडीटी विद्यापीठाचे भव्य उपकेंद्र साकारले जात आहे.तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि बल्लारपूर येथे स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्रही उभे राहत असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

“बांबू सखी ही एक ज्योत आहे; या एका ज्योतीतून हजारो ज्योती प्रज्वलित करायच्या आहेत. येथील महिला उद्योजक म्हणून पुढे येतील आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र राज्यातीलच नव्हे तर देशातील रोजगारनिर्मितीचे सर्वोत्तम केंद्र ठरेल,” असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button