
बुकिंग करूनही १५-३० दिवस प्रतीक्षा ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एच.पी. गॅस (HP Gas) अंतर्गत कार्यरत श्री गॅस सर्व्हिसकडून सिलिंडर वितरणात प्रचंड अनियमितता होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. बुकिंग करूनही महिनाभर सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघर कोलमडले असून नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात एजन्सीच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले आहेत. डिलिव्हरी देण्यापूर्वी ग्राहकांना कोणताही फोन केला जात नाही. चुकून ग्राहक घरी नसल्यास सिलिंडर परत नेऊन थेट ‘कॅन्सल’ केला जातो. एकदा सिलिंडर परत गेला की ग्राहकाला पुन्हा नवीन बुकिंग करण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे त्यांना रांगेत सर्वात मागे जावे लागते. काही नागरिकांना एका सिलिंडरसाठी १५ ते ३० दिवस वाट पाहावी लागत आहे. एजन्सीमध्ये विचारणा केली असता “गाड्या कमी येत आहेत” असे सांगून ग्राहकांना परत पाठवले जाते.
सर्वसामान्य नागरिक रांगेत असताना काही ओळखीच्या व्यक्तींना प्राधान्याने सिलिंडर पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. रद्द केलेल्या सिलिंडरच्या पुनर्वितरणात कोणतीही पारदर्शकता नसल्याने यामागे काही काळाबाजार तर सुरू नाही ना? अशी शंकाही नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.
या त्रासाला कंटाळून मंगळवारी २४ हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षरीसह निवेदन मनोज डहाडे (खरेदी अधिकारी) यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यामध्ये डिलिव्हरीपूर्वी फोन करणे बंधनकारक करावे आणि वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी करावी. सिलिंडर डिलिव्हरीपूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देणे सक्तीचे करावे. रद्द झालेल्या सिलिंडरचे प्राधान्याने पुनर्वितरण व्हावे. एजन्सीच्या संपूर्ण वितरण प्रणालीची पारदर्शक चौकशी व्हावी. दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आता या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभाग संबंधित गॅस एजन्सीवर काय कारवाई करतो, याकडे शहरातील गॅस ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
“सर्वसामान्य नागरिकांना गॅस एजन्सीच्या चकरा मारण्याची वेळ येऊ नये. बुकिंग केलेला सिलेंडर वेळेवर घरपोच मिळावा. डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडे ग्राहकांशी संपर्कासाठी फोनची सुविधा असणे आवश्यक आहे. पारदर्शक व जबाबदार सेवा देणे ही एजन्सीची प्राथमिक जबाबदारी आहे.”
— प्रफुल मेश्राम (लीला बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली)



