
‘ऑपरेशन रोशनी’ आणि नागरी कृती उपक्रमांतून पोलीस दलाचा मदतीचा हात
भामरागड : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याच मालिकेचा एक भाग म्हणून, ६ मे २०२६ रोजी भामरागड येथील आठवडी बाजार परिसरात एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा दिली. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. खंडेलवाल, पोलीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन गिरसावळे, डॉ. रोशनी किरंगे आणि परिचारिका चारुलता दुर्गे यांनी नागरिकांची तपासणी केली. परिसरातील सुमारे १०४ नागरिकांनी विविध आजारांसाठी तपासणी करून घेतली. रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे पुरवण्यात आली, तर १९ गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये संदर्भीत (Refer) करण्यात आले. शिबिरात महिलांच्या आरोग्यावर विशेष भर देऊन त्यांना पोषण आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य सेवेसोबतच, आठवडी बाजारात उपस्थित नागरिकांना बॅनरच्या माध्यमातून पोलीस दलाच्या इतर उपक्रमांची माहिती देण्यात आली. शहीद जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि नागरी कृती शाखेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
केवळ आजचे शिबिरच नव्हे, तर गडचिरोली पोलीस दल गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे: आतापर्यंत १९७ मेळाव्यांमधून सुमारे ४२,५०० पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ५ मोठ्या शिबिरांच्या माध्यमातून ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ९,९७१ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, १,४१२ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत पार पडल्या आहेत.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता उजे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.



