
दर बुधवारी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार उपचार आणि मार्गदर्शन ; वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विशेष उपक्रम
गडचिरोली : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिला आणि विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये ‘पीसीओडी’ (PCOD) या समस्येचे प्रमाण वेगाने वाढत आहे. या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि महिलांना एकाच छताखाली तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विशेष ‘PCOD क्लिनिक’चे उद्घाटन ६ मे रोजी उत्साहात संपन्न झाले.
महिलांना केवळ औषधोपचारच नव्हे, तर आहार आणि जीवनशैलीत बदलांबाबतही योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे. दर बुधवारी या विशेष क्लिनिकमध्ये रुग्ण तपासणी केली जाईल. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मानसी कांबळे या पीसीओडीग्रस्त मुली व महिलांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार आणि समुपदेशन पुरवणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी यावेळी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. पीसीओडीची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे सांगण्यात आली: मासिक पाळी अनियमित होणे. अचानक वजन वाढणे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे किंवा मुरूम येणे. गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होणे.
डॉ. लहाडे यांच्या मते, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीच्या माध्यमातून या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. कोणतीही लक्षणे आढळल्यास महिलांनी लाजू नये किंवा घाबरू नये, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, डॉ. अंबरीश तिवारी, डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बागराज धुर्वे, सहाय्यक अधिसेविका आशा बावणे, नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या मेघा कुलसुंगे यांच्यासह नर्सिंगचे विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



