
१५.७५ कोटींच्या निधीबाबत सकारात्मक निर्णय ; मारोडा तलावाचे सौंदर्यीकरण आणि लपा-मामा तलाव जोडणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश
मुंबई/चंद्रपूर : जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील माजी मालगुजारी (मामा) तलाव आणि इतर तलावांच्या पुनरुज्जीवन व दुरुस्तीच्या कामांना आता मोठी गती मिळणार आहे. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंत्रालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत यासंदर्भात अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.
मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील जलसंधारणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा आणि बल्लारपूर क्षेत्रातील एकूण ४५ तलावांच्या दुरुस्ती व पुनरुज्जीवनासाठी अंदाजे १५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे. तलाव फुटीसारखी आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. संबंधित कामांचा समावेश आगामी जून २०२६ अधिवेशनातील “व्हाईट बुक” मध्ये करण्याबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे जन्मगाव असलेल्या मारोडा येथील ऐतिहासिक तलावाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा आग्रहाने मांडला. यावर मारोडा तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, लपा तलावाला मामा तलावाशी जोडण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सचिव जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी तलावांमध्ये साचलेला गाळ आणि घटलेल्या जलसाठा क्षमतेमुळे शेती व पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. जलसंधारण आणि पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने हे निर्णय बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीला प्रादेशिक जलसंधारण अधिकारी खटके, अधीक्षक अभियंता प्रकाश पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, कार्यकारी अभियंता संदीप खांबाईत उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह सहभागी झाले होते.



