गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठाच्या ‘STRC’ला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून मान्यता

नवी दिल्ली येथील HCSSC सोबत सामंजस्य करार ; गडचिरोलीतील आदिवासी हस्तकला आणि कौशल्य विकासाला मिळणार जागतिक ओळख

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी हस्तकला, कौशल्य विकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राला (STRC) नवी दिल्ली येथील ‘हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिल’ (HCSSC) कडून अधिकृतपणे “सेंटर ऑफ एक्सलन्स” (CoE) म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण भागीदारीसाठीचा सामंजस्य करार (MoU) नुकताच नवी दिल्ली येथे संपन्न झाला.

या करारामुळे गडचिरोली परिसरातील कारागीर आणि युवकांच्या कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या सहकार्याअंतर्गत खालील प्रमुख बाबींवर भर दिला जाणार आहे: प्रशिक्षक प्रशिक्षण (ToT): उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक प्रशिक्षकांची क्षमता वाढवणे. हस्तकला पुनरुज्जीवन: बांबू हस्तकला, गोंड चित्रकला यांसारख्या कलांना प्रोत्साहन देणे आणि ‘डोकरा’ हस्तकलेसारख्या लुप्तप्राय कलांचे पुनरुज्जीवन करणे. शालेय शिक्षण: पारंपरिक हस्तकलेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करून नव्या पिढीला या कलांची ओळख करून देणे. स्किल हबची स्थापना: गडचिरोलीत स्वतंत्र “स्किल हब” निर्माण करून उद्योगांशी सांगड घालणे आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

या यशामागे एसटीआरसीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे दूरदर्शी नेतृत्व लाभले आहे. करारप्रसंगी HCSSC चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि ‘STRC’चे मुख्य कार्यक्रम अधिकारी स्वप्नील गिरडे उपस्थित होते.

या प्रक्रियेत प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, आणि आर.जी.एस.टी. नागपूरच्या सल्लागार प्रगती गोखले यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच, वैज्ञानिक अधिकारी गंधर्व पिलारे आणि विनोद वर्थ्या यांनी या टप्प्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार बळ

हे नवीन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आता NSQF च्या मानकांनुसार प्रशिक्षण, डिझाईन नवोपक्रम आणि उद्योजकता प्रोत्साहनासाठी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होईल. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी कारागीर, महिला बचत गट आणि युवकांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध होऊन प्रादेशिक आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button