भंडाराविदर्भ

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत चार प्रकरणास तात्काळ अर्थसहाय्य मंजूर करा – जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देश

कागदपत्रांची खातरजमा करून पीडितांना मदतीसाठी विलंब लावू नका; जिल्हा दक्षता नियंत्रण समितीची बैठक संपन्न

भंडारा : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अंतर्गत दाखल प्रकरणांमधील पीडितांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या कायद्यांतर्गत आज झालेल्या मासिक बैठकीत चार पीडित व्यक्तींच्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, त्यांना प्रथम हप्ता अर्थसहाय्य मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आयोजित जिल्हा दक्षता नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अनुसूचित जाती-जमातीमधील पीडित व्यक्तींना आर्थिक मदत मिळण्यासाठी बराच वेळ लागतो, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पीडित व्यक्ती संबंधित समाजाची असल्याची खातरजमा झाल्यावर, कुटुंबाकडील उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर त्यांना त्वरित आर्थिक सहाय्य करावे, जेणेकरून त्यांना वेळेत मदत मिळेल.

दोषारोप पत्र: द्वितीय हप्ता अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी पोलीस विभागाने दोषारोप पत्र (Charge sheet) त्वरित समाज कल्याण विभागाकडे सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. निधीची मागणी: उर्वरित लाभार्थ्यांसाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी समाज कल्याण विभागाने आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे त्वरित निधीची मागणी करावी. नियमित बैठका: सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात या कायद्यांतर्गत नियमित बैठका घेऊन प्रकरणांचा आढावा घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीला पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी झेड.के. राऊत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, जिल्हा अभियोक्ता विनोद भोले, सहायक संचालक एच.पी. रणदिवे, आदिवासी विकास विभागाचे एस.जी. वैरागडे, महिला व बालविकास अधिकारी अरुण बांदूरकर यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button