
गडचिरोली : गडचिरोली व चामोर्शी तालुका सीमेवर असलेल्या भेंडीकन्हार जंगलपरिसरात पोटेगाव पोलिस व मुक्तीपथ टीमने कारवाई करीत मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी ठोक दारूविक्रेता प्रेमकुमार लकडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
भेंडीकन्हार हे गाव अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध आहे. येथील अनेक विक्रेत्यांवर गुन्हा दाखल होऊन काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. या गावातील विक्रेत्यांच्या माध्यमातून परिसरातील विविध गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. जंगलपरिसराचा आधार घेऊन विक्रेते दारू गाळताना. अशातच पोटेगाव पोलिस, गडचिरोली व चामोर्शी मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या जंगल परिसरात दोन दिवस मोहीम राबवली असता, विविध ठिकाणी टाकलेला मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व दारू मिळून आली. पोलिसांनी पंचनामा करून प्रेमकुमार लकडा या ठोक दारू विक्रेतावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस स्टेशन पोटेगावचे एपीआय राजू गवळी, एएसआय अशोक भसारकर, आशिष माजी, पितांबर इजमनकर यांनी केली.



