गडचिरोलीविदर्भ

१५ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

एल अँड टी फायनान्स कंपनीत २० फील्ड ऑफिसर पदांसाठी भरती; बेरोजगार युवकांना संधी

गडचिरोली : बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नोकरी देणारे व नोकरी शोधणारे यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून सामाजिक न्याय भवन, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, एलआयसी चौकाजवळ, गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्यात फायनान्स क्षेत्रातील नामांकित एल अँड टी फायनान्स ही खाजगी कंपनी सहभागी होणार असून फील्ड ऑफिसर पदासाठी जिल्ह्यातील एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर पदांसाठी २० ते ३० वयोगटातील पदवीधर बेरोजगार पुरुष उमेदवार पात्र राहणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना १८ हजार ५०० रुपये वेतन देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष सहभागी व्हावे. जास्तीत-जास्त बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button