
चामोर्शी : तालुक्यातील मुधोली तुकूम येथे ‘मुक्तीपथ’ गाव संघटनेच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अवैध दारूविक्री विरोधात धडक कारवाई केली. हॉटेलच्या नावाखाली छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या दारू गोदामावर पोलिसांनी धाड टाकून ३१ निपा इंग्लिश दारू जप्त केली. या प्रकरणी विक्रेता हरिदास लक्ष्मण गोटपतीवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुधोली गाव हे चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची आयात केली जाते. गावात गेल्या एक वर्षापासून दोन विक्रेते सक्रिय असल्याची कुणकुण ग्रामस्थांना होती. यातील एक विक्रेता हॉटेल चालविण्याच्या बहाण्याने गोदामातून छुप्या पद्धतीने दारूची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली होती.
गावात ‘मुक्तीपथ शक्तीपथ’ कार्यक्रमांतर्गत महिलांचे संघटन करून दारूमुक्तीसाठी जनजागृती करण्यात आली होती. याच प्रेरणेतून गावातील महिलांनी दारू हद्दपार करण्याचा विडा उचलला. माहिती मिळताच महिलांनी आष्टी पोलिसांना पाचारण केले. आष्टी पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री. वनकर यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि अवैध दारूसाठा जप्त करून विक्रेत्यावर गुन्हा नोंदवला.
या संयुक्त मोहिमेत मुक्तीपथचे आनंद सिडाम यांच्यासह गाव संघटनेच्या चेतना घोगरे, शकुंतला डाकोटे, मयुरी डाकोटे, वर्षा घोगरे, मनिषा घोगरे, प्रियंका डाखोटे आणि इतर अनेक महिला सदस्यांनी सहभाग घेतला होता. ”मुधोली गाव दारूमुक्त करण्यासाठी महिलांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून, यापुढेही अवैध धंद्यांविरोधात अशीच मोहीम सुरू राहील,” असा इशारा गाव संघटनेने दिला आहे.



