क्राईमगडचिरोलीविदर्भ

रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

कुरखेडा : कुरखेडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चारभट्टी नियतक्षेत्रात वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला असून, वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियतक्षेत्र चारभट्टीमधील कक्ष क्रमांक १७४ मध्ये रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून अवैध रेती उपसा आणि तिची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला.

वनविभागाचे पथक दबा धरून बसले असताना, धानोरी येथील रहिवासी धनंजय गोमाजी बन्सोड यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्र. MH33AC4341) अवैध रेती भरून वाहतूक करताना आढळून आला. वन पथकाने तत्काळ या वाहनाची अडवणूक करून ट्रॅक्टर जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर मालकावर वन कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई क्षेत्रसहाय्यक बी. बी. तुलावी, वनरक्षक मुकेश सयाम, वनरक्षक के. के. काशिवार, वनरक्षक एम. के. दूधबळे, वनमजूर मधुकर दरवडे आणि वाहनचालक चेतन कुमरे यांनी पार पडली. वनसंपदेचे नुकसान करणाऱ्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वनविभागाने दिला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे. कुरखेडा वनविभागाकडून आता रात्रीची गस्त अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button