
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे आता परिवर्तनाच्या वाटेवर आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोरची तालुक्यातील कोटगुल जवळील गजेगाव येथील महिलांनी एकीच्या बळावर गेल्या ५ वर्षांपासून गावात कडक दारूविक्रीबंदी लागू केली असून, त्यांचा हा लढा आजही अविरतपणे सुरू आहे.
सुमारे ३०० लोकसंख्या आणि ५० घरांच्या या छोट्याशा गावात सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने राहतात. एकेकाळी दारूमुळे कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडण्याची भीती होती, परंतु येथील महिलांनी एकत्र येत ‘मुक्तीपथ’ आणि ‘शक्तीपथ’ संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेतला. आज या गावात कोणीही दारू विक्री करण्याचे धाडस करत नाही. विशेष म्हणजे, गावातील तरुण वर्ग व्यसनांपासून दूर राहून कामावर जातो आणि कुटुंबाला हातभार लावतो, ज्यामुळे गावातील महिलांचे जीवन आनंदी झाले आहे. गजेगावची शक्तीपथ महिला संघटना केवळ दारूबंदीपुरती मर्यादित नसून, गावातील प्रत्येक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ती हिरीरीने सहभागी होते. मुक्तीपथ कार्यकर्त्यांच्या एका आवाहनावर सर्व महिला एकत्र जमून तातडीने निर्णय घेतात.
दारूमुक्तीचा हा यशस्वी लढा सुरू ठेवण्यासाठी गावातील सुषमा राजेंद्र मडावी (अध्यक्ष, शक्तीपथ संघटना), महेश्वरी महेश गावडे (उपाध्यक्ष), शितल सुखदेव ताराम (सचिव), सदस्य किरण गावडे, समित गावडे, ममता बोगा, सुमन काटेंगे, सुमित्रा नेताम, तशीला गावडे, फुलमी गावडे, सुरेखा तुलामी, सविता, सोनाली, संतोषी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यासाठी शिवराजपूरचे पोलीस पाटील आणि गावातील उत्साही युवती वर्ग यांचे वेळोवेळी सहकार्य लाभते. गजेगावच्या या यशोगाथेने इतर गावांसमोरही एक आदर्श निर्माण केला असून, “महिलांनी ठरवले तर गाव व्यसनमुक्त होऊ शकते,” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



