
माजी खा. डॉ. अशोक नेते आणि आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतली ग्रामस्थांची भेट ; मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे आश्वासन
गडचिरोली : शहरानजीकच्या गुरवळा, हिरापूर आणि राखी परिसरात प्रस्तावित असलेल्या विमानतळ भूमी अधिग्रहणावरून सध्या रणकंदन माजले आहे. “शेती ही आमची माता आणि उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे, ती कोणत्याही परिस्थितीत शासनाला देणार नाही,” असा ठाम पवित्रा घेत ग्रामस्थांनी अधिग्रहणाविरोधात एल्गार पुकारला आहे.
या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांची बाजू ऐकून घेण्यासाठी माजी खासदार तथा भाजप एसटी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते आणि गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गुरवळा व हिरापूर येथे जाऊन थेट बांधावर आढावा बैठक घेतली. बैठकीत उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. “वडिलोपार्जित जमीन हाच आमचा वारसा आहे. विमानतळासाठी आमची सुपीक जमीन अधिग्रहित करू नका,” अशी कळकळीची विनंती त्यांनी लोकप्रतिनिधींना केली. यावेळी “आम्ही शेती देणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ. नेते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय होऊ दिला जाणार नाही. या संदर्भात मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करेन. लवकरच गावातील शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणून यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल.”
जनतेने ज्या विश्वासाने मला निवडून दिले आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. भूमिपुत्रांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन आमदार नरोटे यांनी दिले.
या बैठकीला किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, युवा नेते अनिल तिडके, राहुल पोरेड्डीवार यांच्यासह गुरवळा सरपंच जया मंटकवार, हिरापूर सरपंच शालिनी कुमरे, राखी सरपंच ज्योती तलांडे आणि मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रस्तावित विमानतळासाठी जमीन मोजणीच्या हालचाली सुरू होताच गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, आता लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दाद मागण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही, जोपर्यंत लेखी ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.



