गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात एन.ई.पी. अंतर्गत अभ्यासक्रम विकास कार्यशाळा ; १२ विषयांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन ​

​राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यावर भर

​गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) प्रभावी अंमलबजावणीसाठी नुकतेच ‘अभ्यासक्रम विकास कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या प्रेरणेतून आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार काळाशी सुसंगत आणि दर्जेदार स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांमधील तज्ज्ञ आणि साधन व्यक्तींनी उपस्थित राहून पदव्युत्तर विभागातील विविध १२ विषयांच्या अभ्यासक्रम रचनेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला मोठे महत्त्व असून, त्यानुसार अभ्यासक्रम तयार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रगती नरखेडकर यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तर साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले डॉ. अजित श्रीरंगापुरे, डॉ. प्रदीप मेश्राम आणि डॉ. गणेश केदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यशाळेत एकूण १२ विषयांच्या अभ्यासक्रम विकासासाठी राज्यातील व राज्याबाहेरील नामांकित संस्थांमधील साधन व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये ​डॉ. संदीप कुमार वर्मा (महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा), ​प्राचार्य डॉ. सुजित मेहेत्रे (सिटी कॉलेज, नागपूर), ​प्राचार्य डॉ. अजित श्रीरंगापुरे (भंडारा), ​डॉ. गिरीष काटकर (तायवाडे कॉलेज, कोराडी), ​प्रो. डॉ. मनीषा कोडापे (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ), ​प्रोफेसर डॉ. राजेश बर्डे (व्ही.आय.एस.टी., अमरावती), ​प्रो. गणेश केदार (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ),  ​प्रो. अमोल पडवळ (आंबेडकर युनिव्हर्सिटी, दिल्ली), ​डॉ. एन.जी. पेंडसे (राणी दुर्गावती युनिव्हर्सिटी, जबलपूर), ​डॉ. अभिजीत मेंढे (व्ही.आय.एस.टी., अमरावती), ​प्रो. डॉ. प्रदीप मेश्राम (जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा), ​प्रो. डॉ. राजेंद्र वाटाणे (तायवाडे महाविद्यालय, महादुला) यांनी आपापल्या विषयांतर्गत एन.ई.पी. (NEP) नुसार स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्याकरिता सखोल मार्गदर्शन केले.

या प्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक मिस्त्री, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, आणि मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील प्राध्यापक वर्गाने अभ्यासक्रम अधिक समृद्ध करण्यासाठी या कार्यशाळेत विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संचालन सहाय्यक प्राध्यापक विकास पूनसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. अशोक मिस्त्री यांनी मानले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनीष देशपांडे यांनी जबाबदारी चोख पार पाडली. तसेच कार्यक्रमाची संपूर्ण प्रशासकीय बाजू डॉ. हेमंत बारसागडे यांनी सांभाळली. ही कार्यशाळा गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जात भर घालणारी ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button