भंडाराविदर्भ

गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या आणि १ लाख मिळवा ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

माहिती देणाऱ्याचे नाव राहणार गुप्त; पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत १० प्रस्तावांना मंजुरी

भंडारा : गर्भलिंग परीक्षण हा सामाजिक कलंक असून तो कायद्याने गंभीर गुन्हा आहे. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टर किंवा सोनोग्राफी सेंटरची खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीस १ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात झालेल्या या बैठकीत समितीसमोर एकूण १० प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. गर्भलिंग परीक्षण करून मुलगी असल्यास तिला गर्भातच मारणे, यासाठी प्रवृत्त करणे किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्याची शंका आल्यास नागरिक प्रशासनाला माहिती देऊ शकतात. पारितोषिक: माहिती खरी ठरल्यास आणि न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर संबंधित माहिती देणाऱ्यास १ लाख रुपये दिले जातील. गोपनीयता: माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, जेणेकरून नागरिकांनी न घाबरता पुढे यावे.

बेकायदेशीर गर्भलिंग निदान किंवा गर्भपाताबाबत तक्रार करण्यासाठी शासनाने खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत: हेल्पलाईन क्रमांक: १८००२३३४४७५, टोल फ्री नंबर: १०४, वेबसाईट: https://amchimulgi.maha.in

या बैठकीला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दीप्ती डोकरीमारे, कायदेविषयक सल्लागार ॲड. विनोद भोले, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र कुकडे, सामाजिक कार्यकर्त्या मृणाल मुनीश्वर (जिल्हा समन्वयक, युवा सरल असोसिएशन) आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणुका उंबारकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी आणि ‘लेक वाचवा’ अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरांतून सहकार्य करण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button