
गडचिरोली : एकीकडे ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीचे जाळे पसरत असताना, मुलचेरा तालुक्यातील लोहारा या छोट्याशा गावाने मात्र एक आगळावेगळा आदर्श उभा केला आहे. गावातील युवकांच्या संघटित पुढाकारातून व ग्रामसभेच्या निर्णयामुळे गेल्या १७ वर्षांपासून गावात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद आहे, या गावात अवैध दारूविक्री बंद गाव म्हणून उभारण्यात आलेले विजयस्तंभ इतरांसाठी पथदर्शक ठरत आहे.
अवघ्या ३५ घरांची लोकसंख्या असलेल्या लोहारा गावात एकेकाळी पाच दारूविक्रेते सक्रिय होते. यामुळे गावात भांडण-तंटे वाढले होते आणि विकासाला खीळ बसली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन करून दारूमुळे होणाऱ्या नुकसानीवर सखोल चर्चा करण्यात आली आणि त्याच दिवशी दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. केवळ निर्णय घेऊन युवक थांबले नाहीत, तर त्यांनी नियमांची कडक अंमलबजावणी केली. गावात दारू विकताना आढळल्यास १० हजार रुपयांचा दंड आणि दारूविक्रेत्याची माहिती देणाऱ्यास ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा ठराव संमत करण्यात आला. युवकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आणि गावातून दारू कायमची हद्दपार झाली.
लोहारा गावातील ही बंदी १७ वर्षांनंतरही टिकून आहे, यात ग्रामस्थांच्या एकजुटीसोबतच मुक्तिपथ अभियानाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. अभियानाचे तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी वेळोवेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करून ही बंदी कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.दारूविक्री बंदीमुळे गावात आता भांडण-तंटे कमी झाले असून शांततेचे वातावरण आहे. व्यसनावर खर्च होणारा पैसा आता कुटुंबाच्या प्रगतीसाठी वापरला जात आहे. लोहारा गावातील या ‘युवा शक्ती’चा आदर्श इतर गावांनीही घेण्याची गरज आता व्यक्त होत आहे.



