गोंदियाविदर्भ

२० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप ; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सतर्क

ऑनलाईन इंटरनेट फार्मसीला विरोध करत देशभरातील केमिस्ट रस्त्यावर ; अत्यावश्यक औषधांसाठी प्रशासनाने जारी केले हेल्पलाईन क्रमांक

गोंदिया : ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ या संघटनेच्या देशव्यापी आवाहनानुसार, येत्या बुधवार, २० मे रोजी देशभरातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी ‘भारत बंद’ पुकारला आहे. ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या (E-Pharmacy) वाढत्या प्रभावाला विरोध आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा एकदिवसीय बंद पाळला जाणार आहे. या बंदमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, गोंदिया अन्न व औषध प्रशासनाने (FDA) रुग्णांच्या सोयीसाठी विशेष खबरदारी आणि कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

औषध पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने आधीच पावले उचलली आहेत. या संदर्भात ८ मे रोजी जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. “रुग्णांचे प्राण आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये,” असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना औषधे मिळावीत, यासाठी काही प्रमुख औषध दुकाने बंदच्या काळातही सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून, संघटनांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याशिवाय, सर्व तालुक्यांमध्ये अत्यावश्यक औषध पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष संपर्क व्यक्तींची यादी तयार करण्यात येत आहे.

प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. बंदच्या दिवशी आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा गंभीर रुग्णासाठी औषधांची तातडीने गरज भासल्यास नागरिकांनी खालील नियंत्रण अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा: अभिषेक चवरडोल (औषध निरीक्षक) – ८८९७९४०९८१, अतिश सरकाळे (सहायक आयुक्त – औषधे) – ९८९०१६५०१८

केमिस्ट संघटनेने आपल्या मागण्यांसाठी हा बंद पुकारला असला, तरी गोंदिया जिल्हा प्रशासनाने केलेल्या चोख नियोजनामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button