गोंदियाविदर्भ

पाटबंधारे विभागाच्या गोदामाला भीषण आग; महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक

​गोंदिया : शहरातील छोटा गोंदिया परिसरात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या गोदामाला रविवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोदामात साठवून ठेवलेल्या विभागाच्या महत्त्वाच्या फाईल्स, जुने फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

​आगीची ही घटना रविवारी (१७ मे) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोदामात कागदपत्रांचे गठ्ठे आणि लाकडी फर्निचर मोठ्या प्रमाणात असल्याने आग आतल्या आत धुमसत राहिली.

​रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाला पुन्हा दोन वाहने पाठवून रात्री उशिरापर्यंत आग विझवावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे, सोमवारी (१८ मे) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आगीने तिसऱ्यांदा भडका घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन विभागाने पुन्हा एक वाहन घटनास्थळी पाचारण केले होते.

​स्थानिक नागरिक विनोद पंधरे यांनी आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली. या मोहिमेत वाहनचालक लोकचंद कावडे, मोहनिश नागदवने, नीलेश चौहान, फायरमन मुकेश माने, आकाश गर्ग, लांजेवार, अशोक पटले आणि मिताराम गौतम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​पाटबंधारे विभागाच्या या गोदामात अनेक वर्षांच्या जुन्या फाईल्स आणि दस्तऐवज होते. या आगीमुळे विभागाचे किती महत्त्वाचे रेकॉर्ड नष्ट झाले, याचा अंदाज अद्याप वर्तवण्यात आलेला नाही. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण होते. शॉर्टसर्किट हे कारण सांगितले जात असले, तरी विभागाकडून याची अधिकृत चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button