
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची संकल्पना ; शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सज्
गडचिरोली : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडलेली ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही संकल्पना आता गडचिरोली जिल्ह्यात लोकचळवळ बनली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ४५९ ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कंबर कसली आहे. दुर्गम भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे. या मोहिमेबाबत बोलताना सुहास गाडे म्हणाले की, “आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दूरदृष्टीमुळे आज संपूर्ण गडचिरोली जिल्हा आरोग्य संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग हा या उपक्रमाच्या यशाचा मोठा पुरावा आहे.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला असून, यात आरोग्य शिबिरे: गावागावांत विशेष तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांची आरोग्य स्थिती जाणून घेणे.माता-बाल संगोपन: कुटुंब कल्याण आणि माता-बाल आरोग्याशी संबंधित योजनांची तळागाळात अंमलबजावणी करणे. जनजागृती: साथरोग नियंत्रण आणि वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे. या उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
या मोहिमेचे नियोजन करताना ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधून त्यांना या अभियानात सक्रिय होण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक गावाने आपले आरोग्यविषयक उद्दिष्ट ठरवून ते साध्य करावे, जेणेकरून हे अभियान केवळ शासकीय न राहता एक ‘लोकचळवळ’ बनेल, अशी सूचना त्यांनी दिली आहे.
दुर्गम व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात या उपक्रमामुळे आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामीण जनता आता आरोग्याबाबत अधिक जागरूक होत आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आरोग्य सुविधांचे जाळे विणण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.



