गडचिरोलीविदर्भ

अहेरी नगरपंचायतीत राजकीय वादंग; नगराध्यक्षांवर नियमबाह्य बांधकामाचा आरोप, भाजपची अपात्रतेची मागणी

नगराध्यक्षांचा कारभार ‘सोयीचे राजकारण’, विकासकामांना जाणीवपूर्वक स्थगिती ; भाजप नेत्यांच्या पत्रकार परिषदेने अहेरीत खळबळ

अहेरी : अहेरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोजा करपे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी एका पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांचा ‘मनमानी कारभार’ आणि ‘विकासकामांना अडवणूक’ करत असल्याचा आरोप केला. नियमबाह्य बांधकामामुळे नगराध्यक्षांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, त्याविरोधात भाजप आक्रमक झाला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांच्या बेकायदेशीर कारभाराचा पाढाच वाचला. नियमबाह्य बांधकाम: नगरपंचायतीची पूर्वपरवानगी न घेता नगराध्यक्षांनी स्वतःच्या घराचे बांधकाम नियमबाह्यपणे केले आहे. बोअरवेलचा गैरवापर: शेजाऱ्याच्या नावे मंजूर झालेली बोअरवेल स्वतःच्या अंगणात बसवून त्यावर वॉल कंपाउंड उभारल्याचा आरोप. कारवाईची मागणी: या कायदेशीर उल्लंघनामुळे त्यांना पदमुक्त व अपात्र घोषित करावे, अशी रीतसर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

नगराध्यक्षांच्या शिवसेवेतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने म्हटले की, “स्वतःवर येणाऱ्या अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले आहे. त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांशी काहीही देणेघेणे नाही.” त्यांच्या गावात गेल्या ४ वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तरीही त्या स्वतःच्या कार्यकाळात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना का राबवू शकल्या नाहीत? असा रोखठोक सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

भाजपच्या काळात मंजूर झालेल्या आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निधीतील कामांना जाणीवपूर्वक स्थगिती आणली जात आहे. स्थायी समितीचे सभापती विलास सिडाम यांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचे लेखी पत्र दिले असतानाही, केवळ राजकीय सूडबुद्धीने सहपालकमंत्र्यांकडे खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचा दावा भाजप नगरसेवकांनी केला. यापूर्वीही तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ची खोटी तक्रार केल्याचा जुना पॅटर्न नगराध्यक्षांनी पुन्हा वापरला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचे शिष्टमंडळ आता जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेणार आहे. या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, भाजप गट नेते शालिनी पोहणेकर, नगरसेवक अमोल गुडेलीवार आणि विकास उईके प्रामुख्याने उपस्थित होते. या आरोपांमुळे अहेरीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता नगराध्यक्षांच्या बाजूने काय स्पष्टीकरण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button