
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामाचा घेतला आढावा; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
गडचिरोली : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तळोधी – कुनघाडा – पावलासनपेठ मार्गावरील पुलाच्या (पुलिया) बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी केली. या महत्वपूर्ण कामाचा आढावा घेत त्यांनी कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्याचे कडक निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाळ्यात तसेच इतर सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पाहणी दरम्यान खासदार डॉ. किरसान यांनी कामाच्या दर्जाची बारकाईने माहिती घेतली. “दुर्गम आणि ग्रामीण भागातील विकासकामे ही दीर्घकाळ टिकणारी असायला हवीत. या बांधकामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असे त्यांनी उपस्थित अधिकारी व कंत्राटदारांना ठणकावून सांगितले.
तळोधी – कुनघाडा – पावलासनपेठ हा मार्ग या परिसरातील अनेक गावांना जोडणारा मुख्य दुवा आहे. या मार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारी संपर्क तुटण्याची समस्या कायमची मार्गी लागणार आहे. वाहतूक सुलभ होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल. खासदारांनी स्वतः दखल घेऊन कामाची पाहणी केल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माधव गावड, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे संबंधित अधिकारी, कनिष्ठ अभियंते, बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



