
रस्त्यालगतच्या झाडामुळे टळला मोठा अनर्थ; बस चालकाने मद्यप्राशन केल्याचा प्रवाशांचा गंभीर आरोप
धानोरा : धानोरा-मुरूमगाव मार्गावरील वडगावजवळ रविवारी (२४ मे) दुपारी एक खासगी प्रवासी बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बसमधील १८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे धानोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील दल्ली येथून गडचिरोलीकडे येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स बस रविवारी सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती. या बसमध्ये चालक व वाहकासह एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते. दुपारी सुमारे १२:४५ वाजताच्या सुमारास ही बस धानोरा तालुक्यातील वडगाव गावाजवळ पोहोचली. याच दरम्यान अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.
अपघात होताच बसमधील प्रवाशांनी एकच टाहो फोडला आणि परिसरात आरडाओरडा सुरू झाला. सुदैवाने, ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता खराब असल्याने बसचा वेग काहीसा कमी होता. तसेच, बस रस्त्यावरून खाली उतरताना शेजारी असलेल्या एका मोठ्या झाडाला जाऊन अडकली. झाडाचा हा आधार मिळाल्यामुळे बस पूर्णपणे कोलमडली नाही आणि मोठी जीवितहानी टळली; अन्यथा हा अपघात अधिक भीषण ठरला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि परिसरातील काही लोकप्रतिनिधींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तत्परता दाखवत बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
या अपघातात १८ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमींमध्ये नीलकंठ वाडके (वय ५८, रा. मारोडा), चांदणी रामटेके (वय २३, रा. तोरगाव), रवी चावरे (वय ३५, रा. दल्ली, छत्तीसगड – बस चालक) यांचा समावेश आहे. या तिघांनाही प्राथमिक उपचारानंतर पुढील अद्ययावत उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. इतर किरकोळ जखमींवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातून थोडक्यात बचावलेल्या काही प्रवाशांनी बस चालकावर गंभीर आरोप केले आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस चालकाने मद्यप्राशन केले होते आणि नशेत गाडी चालवत असल्यामुळेच त्याचे नियंत्रण सुटले. या आरोपाची दखल घेत धानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, चालकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अपघाताचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.



