भंडाराविदर्भ

रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला, चालक ठार

बावनथडी नदीच्या देवनारा घाटातून सुरू होती तस्करी; रात्रीच्या अंधारात अननुभवी तरुणांच्या जीवाशी खेळ, नागरिकांमधून तीव्र संताप

तुमसर : तुमसर तालुक्यात प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीनं पुन्हा एकदा एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. तुमसर तालुक्यातील मांडवी गावालगतच्या दुर्गम जंगल मार्गावर रविवारी (२४ मे) पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास रेतीची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन उलटला. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक तरुण जागीच ठार झाला. सुमित बालाराम आस्वले (वय २३, रा. रोंघा) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे रोंघा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, रेती तस्करांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि महसूल व पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीपात्रातील देवनारा रेती घाटातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी रेतीची चोरी सुरू आहे. मुख्य रस्त्यांवर पोलिसांची भीती असल्याने रेती माफियांकडून वाहतुकीसाठी मांडवी परिसरातील घनदाट जंगल मार्गाचा वापर केला जात आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर ट्रॅक्टर चालक सुमित आस्वले हा ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून याच धोकादायक जंगल मार्गाने जात होता. मात्र, पहाटे तीनच्या सुमारास अतिवेग आणि खड्डेमय रस्त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि रेतीने भरलेला ट्रॅक्टर थेट रस्त्याकडेला उलटला. ट्रॅक्टरखाली चिरडल्या गेल्याने सुमितचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील रेती माफिया २० ते २५ वयोगटातील तरुण मुलांना पैशांचे आमिष दाखवून या जीवघेण्या व्यवसायात ओढत आहेत. या तरुणांकडे कोणतेही जड वाहन चालविण्याचे विशेष प्रशिक्षण किंवा परवाना नसतानाही त्यांना रात्रीच्या वेळी रेतीचे ट्रॅक्टर चालविण्यास दिले जाते. अर्धवट अनुभव, रात्रीचा अंधार, अतिवेग आणि जंगलातील अत्यंत खराब रस्ते यामुळे या मार्गावर रोजच अपघातांची टांगती तलवार असते. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी माफिया या अननुभवी तरुणांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

दूरस्थ पोलीस चौकी आणि महसूल विभागाच्या हद्दीतून दररोज रात्री शेकडो ब्रास रेतीची अवैध वाहतूक बेधडकपणे सुरू असते. असे असतानाही पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई केली जात नाही. प्रशासनाच्या याच अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे रेती माफियांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून, आता चक्क जंगलात माणसांचे बळी जाऊ लागले आहेत.

या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून गोबरवाही पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा आणि अवैध रेती तस्करांच्या साखळीचा पुढील तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button