
कुडवा येथील छोटा हनुमान मंदिर परिसरात आढळला होता मृतदेह; बहिणीच्या सतर्कतेमुळे खुनाचा गुन्हा उघड, रामनगर पोलिसांची कारवाई
गोंदिया : कौटुंबिक कलह आणि अनैतिक संबंधांच्या संशयातून एका ४४ वर्षीय व्यक्तीची गळा दाबून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गोंदिया शहरालगतच्या कुडवा गावात उघडकीस आली. रामनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कुडवा गावात बुधवारी (२७ मे) सकाळी हा प्रकार समोर आला. सुरुवातीला संशयास्पद वाटणाऱ्या या मृत्यूचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, पतीचा खून केल्याप्रकरणी संशयित पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. राजेंद्र उर्फ राजेश भरतलाल कटरे (वय ४४ वर्षे, रा. कुडवा, गोंदिया) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवार २७ मे रोजी सकाळी ग्राम कुडवा येथील छोटा हनुमान मंदिर परिसरात राजेंद्र कटरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. स्थानिक गावकऱ्यांनी या घटनेची माहिती राजेंद्रची थोरली बहीण नर्मदा दिनेश पंधरे (वय ५१ वर्षे, रा. काटी, बिरसोला) यांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच बहीण नर्मदा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भावाचा मृतदेह पाहिला असता, राजेंद्रच्या गळ्यावर नखांचे ओरखडे आणि गळा आवळल्याच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या. त्यामुळे भावाचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय नर्मदा यांना आला. त्यांनी कसलाही विलंब न लावता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणि चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मृत राजेंद्र कटरे आणि त्याची पत्नी अनिता कटरे यांच्यात मागील काही काळापासून सतत कौटुंबिक वाद आणि भांडणे होत होती. आरोपी अनिता कटरे हिचे गेल्या दीड वर्षांपासून संजय श्यामलाल लिल्हारे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधांची कुणकुण राजेंद्रला लागल्यामुळे पती-पत्नीत वारंवार कडाक्याची भांडणे होत असत. या रोजच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आणि अनैतिक संबंधांचा अडसर दूर करण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने राजेंद्रचा गळा दाबून गेम वाजवल्याचे निष्पन्न झाले.
मृतकाची बहीण नर्मदा पंधरे यांच्या लेखी तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपी पत्नी अनिता राजेंद्र कटरे (वय ३५ वर्षे, रा. कुडवा) आणि तिचा प्रियकर संजय श्यामलाल लिल्हारे (वय ४२ वर्षे, रा. गोंडीटोला) यांच्याविरुद्ध नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३ (१) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करत आहेत.



