
गडचिरोली : एकेकाळी जवळपास ८ ते १० अवैध दारू विक्रेत्यांमुळे त्रस्त असलेल्या गावाने एकजूट दाखवत दारूविक्रीबंदीचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर निर्णयाचा भंग करणाऱ्या एका विक्रेत्यावर थेट दंडात्मक कारवाई करून त्याच्याकडून दंड वसूल केला. या कारवाईच्या धसक्याने गावातील इतर सर्व विक्रेत्यांनी आपले अवैध व्यवसाय कायमचे बंद केले. ही यशोगाथा आहे मुलचेरा तालुक्यातील चुटगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टिकेपल्ली गावाची. या गावात गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून दारूविक्री पूर्णपणे बंद असून, गावाने आजपर्यंत ही बंदी यशस्वीरीत्या टिकवून ठेवली आहे.
मुलचेरा तालुक्यातील टिकेपल्ली गावात २०१५ पूर्वी अवैध दारूविक्री चालत होती. गावातील ८ ते १० दारूविक्रेत्यांमुळे शांतता व सुव्यवस्था पूर्णपणे पायदळी तुडवली जात होती. घरगुती वादांसह गावात भांडण-तंट्याचे प्रमाण वाढले होते. या परिस्थितीला कंटाळून चुटगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दारूविक्री पूर्णपणे बंद राहावी, यासाठी ग्रामसभेत दारूविक्रीबंदीचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी टिकेपल्ली गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामस्थांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीत गावात कुणीही दारूविक्री करणार नाही, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच, नियमाचे उल्लंघन करून दारूविक्री करणाऱ्यास ४० हजार रुपये दंड ठोठावण्याचे ठरले.
या कडक नियमानंतरही काही विक्रेत्यांनी छुप्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरूच ठेवली होती. मात्र, ग्रामस्थांनी मागे न हटता ठरवलेल्या नियमानुसार अहिंसक कृती केली. त्यांनी एका दारूविक्रेत्याची दारू जप्त केली आणि गावकऱ्यांसमोर ठरावाप्रमाणे त्याच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल केली. या धडक कारवाईचा असा काही धसका इतर विक्रेत्यांनी घेतला की, त्यांनी तातडीने आपली दारूविक्री कायमची बंद केली. या धाडसी कारवाईनंतर गेल्या १० वर्षां पेक्षा अधिक काळापासून टिकेपल्ली गावात दारूविक्री पूर्णपणे बंद आहे. ही बंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गावातील महिला व पुरुष नागरिक आजही अत्यंत सक्रिय आहेत. गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना ‘मुक्तिपथ’ तालुका संघटक रुपेश अंबादे व चमूतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते.
गावातील ही बंदी यशस्वी करण्यासाठी मुक्तिपथ संघटना अध्यक्ष तुळशीराम मडावी, सचिव मारोती नैताम, पोलीस पाटील चंद्राजी कोरेत, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजय नैताम, किशोर नैताम, विलास टेकुलवार, गंगाधर टेकुलवार, भीमराव कोरेत, ग्रामसंघ अध्यक्ष सुरेखा मडावी, शारदा नैताम, सुनिता कोरेत, जिवनकला शेडमाके आणि दिपीका समद्दार आदींसह समस्त टिकेपल्ली वासियांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गावाच्या या एकजुटीमुळेच हे शक्य झाले.



