
‘मुक्तिपथ’च्या सहकार्याने गाव झाले दारूमुक्त
धानोरा : तालुक्यातील तुकुम या गावाने अवैध दारूविक्रीविरोधात एकजूट दाखवत एक नवा आदर्श ठेवला आहे. ‘मुक्तिपथ’ गाव संघटनेच्या माध्यमातून महिलांनी दारूविक्रीबंदीचा ठराव पारित करून गेल्या दोन वर्षांपासून गावात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद पाडली आहे. सद्यस्थितीत गावात शांतता व सुव्यवस्था टिकून असून, पुन्हा दारू विक्री होऊ नये, याकरिता महिलांनी चक्क पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे.
धानोरा तालुक्यातील तुकुम येथे अवैध दारूविक्रीमुळे कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले होते. यावर मात करण्यासाठी गावातील महिला संघटनेनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रीतसर दारूविक्रीबंदीचा ठराव पारित करण्यात आला. केवळ ठराव घेऊन महिला थांबल्या नाहीत, तर ज्या घरांमध्ये छुप्या पद्धतीने दारू गाळून विक्री केली जात होती, अशा विक्रेत्यांच्या घरी जाऊन महिलांनी थेट तंबी दिली. ग्रामपंचायत ठरावाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी ठणकावून सांगण्यात आला.
गावात पुन्हा कुठेही अवैध दारूची विक्री सुरू होऊ नये, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला नियमितपणे गावात आणि परिसरात पहारा देतात. विक्रेत्यांच्या हालचालींवर महिला बारीक लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, गावात व्यावसायिक दारू विक्रीसोबतच घरगुती दारू गाळण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामुळे गावातील व्यसनाधीनतेचे प्रमाण कमालीचे घटले असून तरुणाई चुकीच्या मार्गाला लागण्यापासून वाचली आहे.
तुकुम गावाला व्यसनमुक्त करण्याच्या या मोहिमेत गावातील पोलीस पाटील संगीता नरोटे, गावसंघटन अध्यक्ष अनिता गेडाम यांच्यासह ग्रामपंचायत समिती आणि स्थानिक महिलांनी अत्यंत मोलाची व धाडसी भूमिका बजावली. गावातील ही बंदी अशीच कायम टिकून राहावी, यासाठी ‘मुक्तिपथ’चे तालुका संघटक राहुल महाकुळकर आणि भास्कर कड्यामी यांचे ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. तुकुम गावाच्या या यशस्वी पॅटर्नचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामसभेत ‘दारूविक्रीमुक्त गाव’ म्हणून घोषित
सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मागील दोन वर्षांपासून गावात दारूविक्री पूर्णपणे बंद आहे. या यशाची दखल ग्रामसभेत तुकुम गावाला अधिकृतपणे ‘दारूविक्रीमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. भविष्यातही गावात दारू पाऊल ठेवणार नाही, यासाठी ग्रामस्थांनी दारूविक्रीविरोधात सातत्याने संघर्ष करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे.



