
१ ते १.५ लाख रुपयांचे नुकसान ; माणूस महत्त्वाचा की जनावर?, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान थांबण्याचे नाव घेत नाही आहे. तालुक्यातील नगरी येथील शेतकरी मनोहर कुंभारे यांच्या शेतात शनिवारी पहाटेच्या सुमारास रानटी हत्तींच्या कळपाने अचानक शिरकाव केला. या हत्तींनी शेतात एकच धुमाकूळ घालत पिकांची आणि शेतीच्या मालमत्तेची प्रचंड नासधूस केली आहे. हत्तींच्या या आक्रमणामुळे संबंधित शेतकऱ्याचे १ ते १.५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण नगरी परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे आणि वनविभागाच्या संथ कारभारामुळे तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाधित शेतकरी मनोहर कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जंगली जनावरांच्या त्रासापासून आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी खूप मोठा खर्च करून संपूर्ण शेताभोवती लोखंडी जाळीचे मजबूत कुंपण लावले होते. मात्र, पहाटेच्या अंधारात आलेल्या महाकाय हत्तींनी हे लोखंडी कुंपण आणि त्याला आधार देणारे काँक्रीटचे भक्कम खांब अक्षरशः खेळण्यासारखे तोडून टाकले. शेतात प्रवेश केल्यानंतर हत्तींनी पिकावर आलेल्या आणि आंबे लागलेल्या अनेक झाडांची प्रचंड मोडतोड केली. तसेच शेतातील बांबूची झाडे मुळासकट उपटून टाकत संपूर्ण शेत जमीनदोस्त केले.
आपल्या डोळ्यांदेखत शेताची झालेली धूळधाण पाहून शेतकरी कुंभारे यांनी सकाळीच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पंचभाई यांच्याशी संपर्क साधून या घटनेची रीतसर माहिती दिली. मात्र, अत्यंत खेदाची बाब म्हणजे, दुपार उलटून गेली तरी वनविभागाचे कोणतेही पथक किंवा कर्मचारी घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोहोचले नव्हते. वनविभागाच्या या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली आहे.
आपली व्यथा मांडताना शेतकरी मनोहर कुंभारे भावूक झाले होते. ते म्हणाले, “आम्ही हत्ती किंवा इतर कोणत्याही वन्यप्राण्यांच्या विरोधात नाही. आम्ही त्यांना स्वतःहून कोणतीही इजा पोहोचवू शकत नाही, कारण तसे केल्यास कायदा आम्हाला गुन्हेगार ठरवेल आणि आम्हाला थेट कायदेशीर कारवाईला किंवा फाशीला सामोरे जावे लागेल. परंतु, वनविभागाने या प्राण्यांचे काहीतरी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे की नाही?”
त्यांनी पुढे वनविभागाच्या धोरणावर बोट ठेवत सांगितले की, हत्तीने एखाद्या माणसाला चिरडून मारल्यानंतर शासन केवळ कागदोपत्री नुकसानभरपाई देते, पण त्यामुळे गेलेला माणूस कधीच परत येत नाही. त्यामुळे अशी कोणतीही मोठी जीवितहानी घडण्यापूर्वीच वनविभागाने या जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि त्यांना मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित ठिकाणी हलवावे, जेणेकरून शेतकरी आणि त्यांची पिके दोन्ही सुरक्षित राहतील. नगरी परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी आता वनविभागाकडे हा हत्तींचा उपद्रव थांबवण्याची प्रमुख मागणी केली आहे.



