क्राईमगडचिरोलीविदर्भ

कोटपा कायद्याअंतर्गत पाच पानठेल्यांवर कारवाई ; १६ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

मुक्तीपथ अभियान, पोलीस आणि एनसीडी विभागाची संयुक्त धडक मोहीम

धानोरा : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’चे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा शहरात धडक कारवाई करण्यात आली. मुक्तीपथ अभियान, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण (NCD) विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३० मे रोजी धानोरा शहरात बेकायदेशीर तंबाखू विक्री करणाऱ्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. या धडक मोहिमेदरम्यान कोटपा (COTPA) कायद्यांतर्गत शहरातील ५ पानठेल्यांची कसून तपासणी करण्यात आली, तसेच एका घरावर छापा टाकून तब्बल १६ हजार ३०० रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, कारवाईच्या भीतीने शहरातील बहुतांश पानटपऱ्या काही काळासाठी पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

धानोरा शहरात वेगवेगळ्या भागांत राबविलेल्या या मोहिमेदरम्यान कोटपा कायद्याचे थेट उल्लंघन करणाऱ्या ५ प्रमुख पानठेल्यांवर पथकाने दंडात्मक कारवाई केली. याच दरम्यान, शहरातील एका घरात बेकायदेशीरपणे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ त्या संशयित घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये घरात दडवून ठेवलेला मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा उघडकीस आला. पथकाने घटनास्थळावरून एकूण १६ हजार ३०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर धडक कारवाई एनसीडी विभागाचे गौतम राऊत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जनेरसिंग उसेंडी, प्रशांत तोडासे, मुक्तीपथचे तालुका संघटक राहुल महाकुलकर, तालुका उपसंघटक भास्कर कड्यामी, तसेच उषाताई गावडे, नरेश मोहुर्ले, मयुरी चिचघरे आणि नितेश सोनी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन कामगिरी फत्ते केली.

तंबाखूच्या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी बरबाद होत असून, कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे धानोरा तालुका व संपूर्ण गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया आगामी काळातही अविरतपणे सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button