
अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात विजेत्या खेळाडूंचा गौरव
एटापल्ली : तालुक्यातील डुम्मे येथे जय बजरंग क्लबच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला भव्य ग्रामीण क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि खेळाडूंच्या जल्लोषात संपन्न झाला. माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या महोत्सवाने परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दुरध्वनीद्वारे आयोजक आणि खेळाडूंशी थेट संवाद साधला. त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची सर्व बक्षिसे राजे साहेबांतर्फे प्रदान करण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष प्रसाद पुलूरवार आणि जिल्हा सचिव मोहन नामेवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राकेश हिरा (तालुका महामंत्री), राकेश टेलकुंटलवार (पत्रकार), कैलास उसेंडी (सरपंच), बाळू आत्राम (उपसरपंच, गुरुपल्ली), जोगाजी दुर्वा (गाव भूमिया, डुम्मे), दुलसा पुंगाटी (अध्यक्ष, जय बजरंग क्लब) यांच्यासह यशवंत दहागावकर, सुमन पुंगाटी आणि महिला पोलीस हवालदार सरिता मडावी यांची उपस्थिती होती.
या महोत्सवात कबड्डी आणि व्हॉलीबॉल सारख्या चुरशीच्या सामन्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी मैदानात आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले, तर सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. या उपक्रमामुळे संपूर्ण डुम्मे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत दहागावकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय पुंगाटी यांनी केले. या सोहळ्याला स्थानिक नागरिक आणि खेळाडूंची मोठी गर्दी लाभली होती.



