जिल्ह्यात जांभुळ लागवडीसाठी भरपूर वाव – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी
कृषी विज्ञान केंद्रात जांभूळ महोत्सव

गडचिरोली : जिल्ह्यामध्ये नैसर्गीक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असून जिल्ह्यातील कोरची व कुरखेडा तालुक्यांमध्ये जांभळाच्या स्थानिक प्रजाती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शहरी भागांमध्ये कोरची परीसरातील जांभळांची मागणी अलीकडे वाढत असल्यामुळे जांभळांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी पडतांना दिसतो आहे. यावरून असे लक्षात येते की, गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यातही जांभळांची मागणी वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भविष्यात या पिकाला मोठा वाव मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जांभळाच्या स्थानिक वाणांची माहिती, जांभुळ पिकातील जैव विविधतता तसेच जिल्ह्यातील जांभुळ पिकाखालील लागवडीचे क्षेत्र वाढ होण्याच्या दृष्टीने आणि जांभुळ पिकाच्या प्रक्रियेला चालना मिळण्याच्या हेतुने २१ जून रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे “जांभुळ महोत्सव-२०२४” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संदिप एस. कऱ्हाळे, सहयोगी प्राध्यापक (उद्यानविद्या) डॉ. वाय.आर. खोब्रागडे, सहाय्यक प्राध्यापक (गृहविज्ञान) निलिमा पाटील, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) एस.के. लाकडे तसेच बहुसंख्येने शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित होते.

डॉ. संदिप एस. कऱ्हाळे यांनी जांभळामध्ये असेलेले विविध गुणधर्म याविषयी सखोल मार्गदर्शन केले. व उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या घरी किमान एक जांभळाचे झाड लावावे असे आवाहन केले. तसेच आपल्या भागात भात शेती मोठ्या प्रमाणात होत असून धान शेतीच्या बांधावरसुध्दा जांभुळ या फळपिकाची लागवड करावी असे सांगितले.
डॉ. वाय.आर. खोब्रागडे यांनी जांभुळ हे अतिशय नाजुक फळ असून या फळाची काढणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे जेणेकरून फळांना जास्त इजा होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यासाठी शेतकऱ्यांनी शक्यतोवर कमी उंचीवरची फळे हाताने काढावीत व अडचणीच्या ठिकाणची फळे झाडाच्या खाली कपडा किंवा नेटच्या सहाय्याने अलगद वेचून करावी त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त बाजार भाव मिळेल व उत्तम प्रतिचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यास मदत होईल.
कार्यक्रमाप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील जांभळाच्या विविध स्थानिक प्रजातींचे तसेच जांभळाच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थाचे प्रदर्शन सुध्दा शेतकऱ्यांकरीता आयोजीत करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलीमा पाटील यांनी केले तर आभार सुचित लाकडे, उपस्थितांचे मानले. यशस्वीतेकरीता विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. प्रितम एन. चिरडे, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. विक्रम एस. कदम, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) पी.ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (कृषि हवामान शास्त्र) नरेश पी. बुध्देवार, प्रक्षेत्र व्यवस्थापक सुनिता थोटे, शशिकांत सलामे, हवामान निरीक्षक मोहीतकुमार गणविर यांनी सहकार्य केले.



