गडचिरोलीविदर्भ

माओवाद्यांचे आत्मसमर्पण हे भारतीय संविधानावरील विश्वासाची ताकद – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

गडचिरोलीत ८१९ जण मुख्य प्रवाहात

नवजीवन वसाहतीत भव्य साहित्य व पुनर्वसन निधी वितरण सोहळा ; नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या जोडप्याचा पोलिसांतर्फे विशेष सत्कार

गडचिरोली : “गडचिरोली जिल्ह्यात आता शांतता आणि विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत संघर्षाच्या दोन विरुद्ध बाजूंवर उभे असलेले लोक आज शस्त्रे सोडून एकत्र येत आहेत आणि नव्या सन्मानपूर्वक आयुष्याची सुरुवात करत आहेत. ही आपल्या भारतीय संविधानावरील आणि लोकशाही व्यवस्थेवरील विश्वासाची सर्वात मोठी ताकद आहे. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

गडचिरोली येथील नवजीवन वसाहत, नवेगाव येथे आयोजित ‘आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी संवाद व साहित्य वितरण’ या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावुक कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या विशेष सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आत्मसमर्पित सदस्यांशी थेट संवाद साधला. ते म्हणाले की, “भारतीय संविधान प्रत्येकाला मुख्य प्रवाहात परत येण्याची पूर्ण संधी देते. भूतकाळातील चुका मागे ठेवून आता उत्पादक कार्य, रोजगार आणि समाजोपयोगी जीवनाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या चौकटीत राहून आत्मसमर्पित सदस्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. त्यांची सुरक्षा, पुनर्वसन आणि कुटुंबाच्या शिक्षणासाठी पोलीस दल कोणतीही कसर सोडणार नाही.”

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, आत्मसमर्पित सदस्यांना केवळ पुनर्वसन निधी देऊन शासन थांबणार नाही. त्यांना समाजाचा मुख्य घटक बनवण्यासाठी कौशल्य विकास, शालेय शिक्षण, शेती, पशुपालन आणि स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या जातील. या नागरिकांचे आधार कार्ड, बँक खाते, मतदार यादीत नाव नोंदणी यांसारखी आवश्यक शासकीय कागदपत्रे जिल्हा प्रशासनातर्फे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमादरम्यान भूपती, दीपा, चला, तुला, मंजुला, कलम आणि नागेश तलांडी आदी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना केंद्र व राज्य शासनाच्या पुनर्वसन निधीचे अधिकृत धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील महिला बचत गटाच्या सदस्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन, पुरुषांना शेतीसाठी स्प्रे पंप, तसेच ई-श्रम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वाहन चालक परवाने आदी विविध साहित्य व शासकीय लाभांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याचे सर्वात मोठे आणि संवेदनशील आकर्षण म्हणजे, गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष पुढाकारातून आत्मसमर्पित सदस्य अशोक मासा होळी यांची नसबंदी उघडण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना नुकतेच अपत्यप्राप्तीचे सुख लाभले. मुख्य प्रवाहात परतल्यानंतर त्यांच्या घरात पाळणा हलल्याबद्दल या दाम्पत्याचा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष कौतुक व सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील माओवादविरोधी मोहिमेच्या यशाचा मोठा आकडा जाहीर केला. शासनाचे लवचिक आत्मसमर्पण धोरण आणि प्रभावी पुनर्वसन व्यवस्थेमुळे आजवर जिल्ह्यातील तब्बल ८१९ माओवादी सदस्यांनी हिंसेचा मार्ग सोडून गडचिरोली पोलीस आणि प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले असून ते सर्वजण आज सुखी जीवन जगत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या सोहळ्याला राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, पोलीस महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी, आत्मसमर्पित सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या लहान मुलांनी अत्यंत अभिमानाने सादर केलेल्या राष्ट्रगीताने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button