
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील आरोप बिनबुडाचे; भाजयुमो तालुकाध्यक्षांचे काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर
कोरची : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ‘वनवासी’ शब्दाचा वापर केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने कुरखेडा येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) कडाडून विरोध केला आहे. भाजयुमोचे कोरची तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आणि राजकीय कांगावा असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची दिशाभूल करत असून राजकीय स्वार्थासाठी समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कोरेटी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात आपली भूमिका मांडताना युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी म्हणाले की, “‘वनवासी’ या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ ‘जंगलात राहणारे’ असा होतो. मात्र, काँग्रेस पक्ष केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि मतांच्या राजकारणासाठी या शब्दाचा विपर्यास करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशातील आदिवासी समाजाचा खरा विकास आणि सन्मान होत आहे. हे सत्य पचत नसल्यानेच काँग्रेस गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून आदिवासी बांधवांची दिशाभूल करत आहे.”
काँग्रेसने आदिवासीबहुल भागातील विकासाकडे वर्षानुवर्षे केलेल्या दुर्लक्षाची आठवण करून देत कोरेटी यांनी काँग्रेसच्या या आंदोलनाला ‘आदिवासी विरोधी मानसिकतेचे प्रदर्शन’ म्हटले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने नेहमीच आदिवासी संस्कृती, जल-जंगल-जमीन आणि त्यांच्या गौरवशाली परंपरांचा यथोचित सन्मान केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या या दिशाभूल करणाऱ्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कोरची व कुरखेडा परिसरातील भाजप आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचा हा दुटप्पी चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी येत्या काळात स्थानिक पातळीवर आणि गावोगावी जाऊन व्यापक जनजागृती मोहीम राबविणार असल्याचा इशारा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.



